पेन्शनमध्ये वाटा न दिल्यानं मुलानं केली आई-बापाची हत्या

मुख्य आरोपी अवधेश हत्येनंतर फरार आहे

Updated: Jul 19, 2018, 04:08 PM IST
पेन्शनमध्ये वाटा न दिल्यानं मुलानं केली आई-बापाची हत्या  title=

पाटणा : बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील नेउरा भागात मुलानं जन्मदात्यांची निर्घृण हत्या केली. पेन्शनमध्ये वाटा न दिल्यानं नाराज झालेल्या मुलानं बुधवारी पहाटेच आपल्या आईची - वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेचू टोला भागातील रहिवासी असलेले मुनारिका यादव नुकतेच रेल्वे सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना २२ लाख रुपये विभागाकडून मिळाले होते. यातील काही पैसे त्यांनी आपले दोन मुले रमेश आणि अवधेश यांना देऊन काही पैसे आपल्यासाठी राखून ठेवले.

मुनारिक हे सध्या आपला मोठा मुलगा रमेश याच्यासोबत राहत होते. रमेश यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी काही खर्च केला होता. पण, यावर अवधेश मात्र नाराज होता. आपल्या वडिलांकडे तो सतत पैशांची मागणी करत होता. 

अवधेश बुधवारी सकाळीच रमेशच्या घरी दाखल झाला... आणि वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अवधेशनं आपल्या आई-वडिलांवर गोळीबार केला. घटनास्थळावरच दोघांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केलीय... मुख्य आरोपी अवधेश हत्येनंतर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.