सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या घरजावयांना धक्का, वाचा काय आहे आदेश

सासऱ्याच्या मालमत्तेवर हक्क सांगणारी याचिका जावयाने न्यायालयात केली होती

Updated: Oct 5, 2021, 07:49 PM IST
सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या घरजावयांना धक्का, वाचा काय आहे आदेश title=

केरळ : सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या जावयांसाठी एक महत्त्वाची बातमी. सासरच्या मालमत्तेवर जावयाचा कोणताही कायदेशीर अधिकार नसणार आहे. सासरच्या मालमत्तेवर आणि घरावरही जावई हक्क सांगू शकणार नाही. केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. 

केरळ उच्च न्यायालयाचे (Keral High Court) न्यायमूर्ती ए. अनिल कुमार यांनी केरळमधील कन्नूर इथल्या तैलीपरंबा इथले रहिवासी डेव्हिस राफेल यांची याचिका फेटाळताना हा निर्णय दिला. डेव्हिस यांनी त्यांचे सासरे हेंड्री थॉमस यांच्या संपत्तीवर दावा केला होता. यापूर्वी हेंड्री यांना  पाययन्नूर इथल्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता. हेंड्री यांनी कोर्टाला विनंती केली की डेव्हिसला त्याच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्यापासून कायमचे प्रतिबंधित करावं.

हेंड्री थॉमस यांनी फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून जमीन भेट म्हणून मिळाल्याचा दावा केला होता. त्यावर त्यांनी घर बांधून त्यात ते कुटुंबासह राहतात. त्यामुळे या मालमत्तेवर जावयाचा कोणताही अधिकार नसल्याचा युक्तीवाद हेंड्री यांच्या वकिलांनी केला. यावर जावई डेव्हिस यांनी मालमत्तेच्या मालकीवरुन वाद असल्याचं म्हटलं आहे. चर्चच्या अधिकाऱ्यांनी दान पत्राद्वारे ही जमीन कुटुंबाला दिल्याचं डेव्हिस यांनी म्हटलं आहे. 

याशिवाय डेव्हिस यांनी युक्तीवाद केला की त्यांनी हेंड्री यांच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न केलं आहे आणि आपल्याला कुटुंबातील सदस्य म्हणून स्विकारलं आहे. यामुळे त्यांना सासऱ्याचा घरात राहण्याचा अधिकार आहे. न्यायलयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जावयाला सासरच्या कुटुंबातील सदस्य मानता येणार नाही असा निर्णय दिला.