अपघातग्रस्तांना मदत करा, तुमची चौकशी नाही तर मिळणार बक्षीस

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस 

Updated: Oct 5, 2021, 07:04 PM IST
अपघातग्रस्तांना मदत करा, तुमची चौकशी नाही तर मिळणार बक्षीस title=

मुंबई : रस्ते अपघातात (Road Accident) जखमी झालेल्यांना वेळीच मदत मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच उद्देश समोर ठेऊन केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणाऱ्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनतंर्गत जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. 

रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कोणत्याही भीतीशिवाय रुग्णालयात नेलं जाऊ शकतं आणि मदत केल्याने तुम्हाला सरकारकडून बक्षीसही मिळू शकतं. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहून कळवलं आहे. ही योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल.

या योजनेसंदर्भात सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले की, या योजनेचा उद्देश सामान्य जनतेला आपत्कालीन परिस्थितीत रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रेरित करणं आहे.  रस्ते अपघातग्रस्तांना रोख बक्षीसाबरोबरच प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. या पुरस्काराशिवाय राष्ट्रीय स्तरावर 10 मदतनीसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिलं जाईल.