भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क

कोणी लिहिलं भारतीय संविधान, कुठे आहे त्याची मूळ प्रत? 

Updated: Jan 26, 2020, 07:12 AM IST
भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची जागतिक स्तरावर ओळख करणाऱ्या संविधानाविषयी आजवर बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. याचं सर्वाधिक श्रेय हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येतं. याच संविधानाविषयीच्या अशा काही गोष्टी जाणून घेऊया ज्यामुळे एका लोकशाही आणि सार्वभौम राष्ट्राचे नागरिक असण्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल किंबहुना या गोष्टी तुम्हालाही थक्क करुन जातील.

संविधानाची मूळ प्रत ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिली गेली होती. परिणामी संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी करावी लागली होती. 

भारतीय संविधानाच्या इंग्रजी प्रतीमध्ये १,१७,३६९ शब्द आहेत. ज्यामध्ये २२ भागांमध्ये ४४४ कलम आहेत.

मोठ्या प्रमाणातील लिखित स्वरुपातील तरतुदी असणारं हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे. 

भारतीय संविधानाच्या दोन्ही म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी प्रतींचं टंकलेखन करण्यात आलं नव्हतं. जगातील सर्वात मोठं असं हे हस्तलिखित संविधान ठरलं आहे. 

संविधानाची मूळ प्रत ही प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिली गेली होती. इटालिक प्रकारच्या सुलेखन प्रकारात त्यांनी संविधान लिहिलं होतं. ज्याचं प्रकाशन देहरादूनमध्ये करण्यात आलं तर, ते photolithograph 'सर्व्हे ऑफ इंडिया'कडून करण्यात आलं होतं. 

हस्तलिखित संविधानाचं प्रत्येक पान हे शांतीनिकेतनच्या कलाकारांनी सुशोभित केलं होतं. 

संविधानाची हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिण्यात आलेली मूळ प्रत संसदेतील ग्रंथालयात असणाऱ्या एका पेटीत जपून ठेवण्यात आली आहे. 

संविधान तयार करण्यासाठी जवळपास २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. अंतिम मसूदा ठरवण्यापूर्वी त्यात जवळपास २ हजार सुधारणा केल्या गेल्या होत्या. 

भारतीय संविधान हे 'Bag of Borrowings' म्हणूनही ओळखलं जातं. विविध राष्ट्रांच्या संविधानातील काही तरतुदींचा आधार घेत त्या आधारेच तरतुदी करण्यात आल्यामुळे संविधानाला 'Bag of Borrowings' असंही म्हटलं गेलं.