स्वतंत्र भारतातलं गुलाम गाव : तिरंगाच फडकावला गेला नाही या गावात

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटल्यावरही एक गाव असं की जिथे तिरंगा फडकावला गेला नाही.

Updated: Jan 11, 2018, 09:01 PM IST
स्वतंत्र भारतातलं गुलाम गाव : तिरंगाच फडकावला गेला नाही या गावात title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटल्यावरही एक गाव असं की जिथे तिरंगा फडकावला गेला नाही.

गुलाम गाव

भारताल्या स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटून गेली आहेत. परंतु या देशात असंही एक गाव आहे की ज्या गावात तिरंगा फडकावला गेला नाही. या देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला नाही. हरियाणातलं एक गाव असं आहे जे स्वत:ला अजूनही गुलाम समजतं. 

प्रचंड मोठा नरसंहार

हरियाणातील रोहनात गावातले लोक अजूनही स्वत:ला गुलाम समजतात. ४२०० लोकवस्तीच्या या गावात स्वातंत्र्याच्या कोणत्याही खूणा नाहीत. इथे इंग्रजांनी जालियानवाला बागसारखा प्रचंड मोठा नरसंहार केला होता. १८५७ च्या उठावात त्यांनी भाग घेतल्याची त्यांना कठोर शिक्षा दिली गेली होती. 

इंग्रजांच्या क्रौर्याच्या खुणा

या गावातले गावकरी ओमप्रकाश शर्मा सांगतात की इंग्रजांनी तोफा चालवून संपूर्ण गावच उद्धवस्त केलं होतं. इंग्रजांनी या गावातल्या सगळ्या पुरुषांना अटक करून त्यांच्यावरून रोडरोलर चालवून त्यांची क्रूर हत्या केली होती. इंग्रजांपासून वाचण्यासाठी स्त्रियांनी विहिरीत उड्या मारून जीव दिला होता. तरूण मुलांना वडाच्या झाडाला टांगून फाशी दिलं गेलं होतं. आजही ते झाड आणि ती विहिर गावात आहे. 

विकासाच्या प्रतिक्षेत

या गावातील रवींद्र बूरा यांनी सांगितलं की, या गावाचा फक्त ८१०० रुपयांत लिलाव केला गेला होता. अजूनही कागदोपत्री ज्या गावांनी हे गाव विकत घेतलं होतं त्यांच्याच नावावर या गावच्या जमिनी आहेत. यामुळेच गावच्या विकासासुद्धा अडचणी येत आहेत. 

प्रजासत्ताक दिन होणार साजरा

आता मात्र या गावात प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. गावच्या दादी गौरी मंदीराच्या पटांगणात हा कार्यक्रम होईल.  आता तरी सरकार आमच्याकडे लक्ष देईल आणि आम्ही गुलामगिरीच्या दु:खातून मुक्त होऊ अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.