पत्रकार बुखारी यांच्या हत्येप्रकरणी ओळख पटली, एकजण पाकिस्तानी

पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-तय्यबाचा फरार दहशतवादी आणि पाकिस्तानी नागरिक नवीद जट याच्यासह तीन लोकांची ओळख पटली.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2018, 10:27 PM IST
पत्रकार बुखारी यांच्या हत्येप्रकरणी ओळख पटली, एकजण पाकिस्तानी title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी वरिष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-तय्यबाचा फरार दहशतवादी आणि पाकिस्तानी नागरिक नवीद जट याच्यासह तीन लोकांची ओळख पटवली आहे. यातील दोघे दक्षिण काश्मीरचे असून एकजण पाकिस्तानचा आहे. जट हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुखारी यांची हत्या करण्याच्या कटाचे  धागेदोर कुलगाममधील चकमकीत सापडले होते. याप्रकणी चौकशी करताना पोलिसांना पुरावे मिळाले. १४ जून रोजी पत्रकारांच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटरसायकलवर तीन दहशतवादी होते. मध्यभागी जट बसलेला होता. जट हा लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी आहे, जो फेब्रुवारी महिन्यात एसएमएचएस हॉस्पिटलमधून पळून गेला होता.

 शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून याची पडताळणी सुरु आहे. या हत्याकांडात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तर एसआयटी आणि तपास यंत्रणांकडून तिघांचा शोध सुरु आहे. शुजात यांच्या हत्येच्या कटात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा सहभाग असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. 

रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असावा, अशी शक्यता लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवली होती. यानंतर हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर हल्ल्याचा तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.