अयोध्येत सीता-राम मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन

मंदिर आणि मस्जिदच्या मुद्यानं तापलेल्या धरतीवर हिंदू-मुस्लीम एकतेचं अनोखं उदाहरण

Updated: May 21, 2019, 10:21 AM IST
अयोध्येत सीता-राम मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन   title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादग्रस्त जमीन प्रकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून अयोध्या सतत चर्चेत आहे. मंदिर की मस्जिद? या मुद्द्याला अनेक जण आपल्या राजकीय फायद्यासाठी तापवण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. पण, आत्ता मात्र याच अयोध्येत हिंदू - मुस्लीम एकतेचं आणि सांप्रदायिक मिलाफाचं वातावरण दिसून येतंय. श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा पाळली जातेय. 

सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. अयोध्या स्थित श्री सीता राम मंदिरात मुस्लीम समुदायाच्या रोजादारांसाठी रोजा इफ्तारचं आयोजन केलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टनं इफ्तर पार्टीचं आयोजन केलं होतं. 

या रोजा इफ्तारमध्ये मुस्लीम बांधवांशिवाय शहरातील काही साधु-संत आणि शिख समुदायातील काही लोकही सहभागी झाले होते. मंदिराचे महंत युगश किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टनं तिसऱ्यांदा इफ्तार पार्टी आयोजित केली आहे. आम्ही भविष्यातही इफ्तारचं आयोजन सुरू ठेवू, असंही त्यांनी म्हटलंय. 

देशात धर्माच्या नावावर राजकारण होत आहे. परंतु, अशा लोकांसाठी महंत युगल किशोर एक चांगलं उदाहरण आहेत, जे देशांत शांती आणि सांप्रदायिक सौहार्दाचं नवं उदाहरण समोर ठेवत आहेत, असं रोजा इफ्तारसाठी दाखल झालेल्या मुजामिल फिजा यांनी म्हटलंय. याचमुळे अयोध्येत अल्पसंख्यांक असूनही आम्हाला कधीही भीती वाटली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

मुस्लीम बांधवांना रोजा इफ्तारसाठी साधुंनी खजुरासोबतच मंदिरातील प्रसादाचा लाडूही दिला. यावेळी मंदिरात उपस्थित सर्व हिंदू - मुस्लीम आणि शीख प्रतिनिधींनी शांततेची आणि सांप्रदायिक सौहार्दाची शपथही घेतली.