नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार आहे. तर केंद्र सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मात्र शिवसेना हजर राहणार आहे. सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्त लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार आहे.
अधिवेशन सुरळीत चालविण्यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला विविध पक्षांच्या नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतील. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्यामुळे शिवसेना या बैठकीला उपस्थित राहते का याकडे लक्ष लागले होते. शिवसेना हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कारभाराविरुद्ध आक्रमक रूप धारण करतेय का, हे पहावं लागणार आहे. हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्य़ा काळातही अरविंद सावंत यांना अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आलं होतं. पण राज्यातील सत्तासंघर्षामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला होता. भाजपने दिलेला शब्द न पाळल्याने हा राजीनामा दिल्याचं अरविंद सावंत यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.
अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेपुढे समर्थन देण्यापूर्वी एक अट ठेवली होती. शिवसेनेला एनडीएमधून बाहेर पडण्याची ही अट असल्याचं बोललं जातं.