Priest Murder Case: हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून ढली येथील मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे. मरण पावलेली व्यक्ती ही मूळची महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. या पुजाऱ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह मंदिराजवळच्या झाडांमध्ये फेकून देण्यात आला होता. 59 वर्षीय मृत व्यक्ती मागील 2 वर्षांहून अधिक काळापासून या मंदिरात वास्तव्यास होती. सुनील दास असं या मरण पावलेल्या पुजाऱ्याचं नाव आहे.
मंदिर परिसरामध्ये पुजाऱ्याची हत्या झाल्याने ढलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिमला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. ही घटना ढाली पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कांती गावातील भूतेश्वर मंदिरामध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले सुनील दास हे मार्च 2021 पासून भूतेश्वर मंदिरामध्ये राहत होते. सुनील यांनी आपल्या शिष्यांना शेवटचा संपर्क 8 ऑगस्ट रोजी केला होता. मात्र त्यानंतर सुनील यांचा फोनच लागत नव्हता. त्यांचा मोबाईल स्वीच ऑफच येत होता. भूतेश्वर मंदिरामध्येही सुनील यांना शोधण्यासाठी काहीजण मंदिरात गेले असता तिथेही सुनील आढळून आले नाहीत.
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुनील यांच्या अनुयायांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी शनिवारी सुनील यांचा मृतदेह मंदिरापासून 15 मीटर अंतरावर असलेल्या झाडांमध्ये सापडला. मृतदेह सापडल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. सुनील यांच्या मृतदेहावर जखमांचे व्रण असल्याचं दिसून आलं. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
फॉरेन्सिक टीमनेही मृतदेह सापडलेल्या स्थळाबरोबर मंदिराची पहाणी केली. प्राथमिक अंदाजानुसार दांडक्याने सुनील यांना मारहाण करण्यात आली. याच हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हे मंदिर एका टेकडीवर आहे. ही जागा फारच सुनसान आणि एकांतात आहे. या मंदिरापासून 1 किलोमीटपर्यंत कोणीही राहत नाही. मंदिरामध्ये सीसीटीव्ही नाही. शिमलाचे पोलीस अधिक्षक संजीव गांधी यांनी या घटनेला दुजोरा दिला असून अज्ञात गुन्हेगारांनी पुजाऱ्याची हत्या केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये ढली पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता परिस्थितीजन्य पुरावे आणि पोस्टमास्टमच्या अहवालाच्या आधारे तपास करणार असल्याचे समजते. भूतेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या हेतूने, कशासाठी आणि कशी करण्यात आली याचं गूढ अद्याप कायम आहे.