नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु आहे. दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापन करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चा अधिक रंगू लागली. मोदी-पवार भेटीत काय घडले, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. या भेटीबाबत पवार यांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्या भेटीत कोणतीह राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पवार यांनी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि चर्चा केली. तसेच त्याचवेळी अर्थमंत्री निर्माला सितारामण यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पवार-मोदी भेट कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती हे स्पष्ट होत आहे.
Met @PMOIndia Shri. Narendra Modi in Parliament today to discuss the issues of farmers in Maharashtra. This year the seasonal rainfall has created Havoc engulfing 325 talukas of Maharashtra causing heavy damage of crops over 54.22 lakh hectares of area. pic.twitter.com/90Nt7ZlWGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 20, 2019
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी पवार यांनी महाराष्ट्रात ओला आणि कोरड्या दुष्काळाची माहीती दिली. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिले आहे.
केंद्रातील मोदी सरकारवर शिवसेनेने पुन्हा हल्लाबोल केला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे, 'शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका.' आधीच कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. त्यात कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाड्यात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे हे अस्वस्थ करणारे आहेत. हतबल झालेला शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यांना तातडीने मदत करा. आमहत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, त्यांना आधार द्या आणि त्यांचे प्राण वाचवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आधी कोरडा दुष्काळ आणि त्यानंतर ओला दुष्काळाने शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्याचे जगणे असह्य झाले आहे. शेतकऱ्याला मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांने करायचे काय, हा प्रश्न त्याच्यापुढे आहे. काहींचा संयम सुटत चालला आहे. काहींनी मृत्यूला जवळ केले आहे. हे संकट दूर झाले पाहिजे. अन्यथा राज्यात शेतकरी जगलाच नाही तर पुढील स्थिती अत्यंत भयंकर असेल, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे.