रामराजे शिंदे / नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची यूपीएच्या चेअरमनपदी (UPA chairman) निवडीची शक्यता आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे.
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी 'झी २४ तास'ने सर्वात आधी हे वृत्त दिले आहे. भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.
शरद पवार यांच्या माध्यमातून यूपीए अधिक बळकट करण्यासाठी ही राजकीय खेळी असणार आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि सक्षम पर्याय देण्यासाठी हे मोठे पाऊल उचण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. शक्य नसताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत भाजपला विरोधी पक्षात बसवले आहे. तसेच पवार हे यूपीएतील घटक पक्षांचे नेतृत्व करु शकतात, त्यामुळे ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.