GSTच्या लोकार्पण कार्यक्रमात पवारांना मानाचं स्थान!

देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. 

Updated: Jul 1, 2017, 07:14 AM IST
GSTच्या लोकार्पण कार्यक्रमात पवारांना मानाचं स्थान! title=

नवी दिल्ली : देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार आणि दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिग्गजांची या कार्यक्रमाला उपस्थिती असली तरी शरद पवार ज्या ठिकाणी बसले होते त्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. GSTच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये शरद पवार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बसले होते. मुख्य म्हणजे आडवाणी आणि अमित शहा यांच्याबरोबर शरद पवार हे पहिल्या रांगेत बसले होते.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष यांनी जीएसटी घाईघाईने लागू होत असल्याची टीका करीत, या समारंभावर बहिष्कार घातला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजपासून जीएसटी अंमलबजावणी म्हणजे अर्धी शिजलेली खिचडी आहे, अशी टीका केली. प्रत्यक्षात ज्यांनी जीएसटीसाठी प्रयत्न केले, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही सेंट्रल हॉलमध्ये नव्हते. नितीशकुमार यांनी येण्याचे टाळले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही समारंभावर बहिष्कार घातला होता.

राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचा मीरा कुमार यांना पाठिंबा

एकीकडे GSTच्या लोकार्पण सोहळ्याला पवार उपस्थित राहिले असले तरी लवकरच होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांना पवारांनी UPAच्या उमेदवार मीरा कुमार यांना पाठिंबा दिला आहे. मीरा कुमार यांनी ज्यावेळी उमेदावारी अर्ज दाखल केला तेव्हा शरद पवारही उपस्थित होते.