Camera In IIT Delhi Women Washroom: दिल्लीमधील आयआयटीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ बनवण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एका विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तरुणाला अटक केली आहे. या तरुणाला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी 20 वर्षांचा आहे. तो आयआयटीमध्ये स्वीपर म्हणजेच प्रसाधनगृहे स्वच्छ करण्याचं काम करतो. आयआयटीने कंत्राट दिलेल्या एका कंपनीच्या माध्यमातून या तरुणीची येथे नियुक्ती करण्यात आली होती. महिलांच्या वॉशरुममध्ये या तरुणाने मोबाईल लपवला होता. या मोबाईलच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ शूट करायचा. एका विद्यार्थिनीने याविरोधात आयआयटीच्या प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. तरुणी कपडे बदलत असतानाचे अनेक व्हिडीओ या तरुणाने या छुप्या मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्ड केल्याचं सांगण्यात येत आहे.
या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 7 ऑक्टोबर रोजी किशनगढ पोलिसांनी या तरुणाविरोधात आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तातडीने अटक केली. त्याला कोर्टासमोर सादर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा तरुण महिलांच्या वॉशरुममध्ये मोबाईल लपवून त्याच्या कॅमेराच्या मदतीने व्हिडीओ शूट करत असल्याचा प्रकार 6 ऑक्टोबर रोजी समोर आला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तक्रार दाखल करुन या तरुणाला अटक केली. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत असून या कटात तरुण एकटाच होता की त्याला इतर कोणी मदत करत होतं? त्याने शूट केलेले व्हिडीओ पुढे पाठवले का? यासंदर्भातील तपास तांत्रिक माहितीच्या आदारे आणि चौकशीच्या माध्यमातून सुरु आहे.
या प्रकरणासंदर्भात आयआयटी दिल्लीने पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जात आहे असं सांगितलं आहे. या अशा प्रकरणांमध्ये आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. असा कोणताही प्रकार आम्ही सहन करुन घेणार नाही. संस्थेमधील विद्यार्थी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील आणि नियम अधिक कठोर केले जातील असं सांगण्यात आलं आहे.