जेएनयू प्रशासनाची हिंसाचारावर प्रतिक्रिया

 कोणत्याही प्रकारच्या हिंसेची निंदा करत असल्याचे जेएनयूने म्हटले आहे.

Updated: Jan 6, 2020, 09:43 AM IST
जेएनयू प्रशासनाची हिंसाचारावर प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुरु असलेल्या आंदोलनाने रविवारी हिंसक वळण घेतले. इथे झालेल्या तुंबळ हाणामारीत जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यावर हल्ला झाला. बुरखाधारी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करुन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप, आयेषी घोषे केलाय. या हल्ल्यात शिक्षक आणि सुमारे वीस विद्यार्थी जखमी झालेत. या सर्व हिंसाचारावर जेएनयू प्रशासनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रजिस्ट्रेशनला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ केल्याचे यात म्हटले आहे. जेएनयू कॅंपसमध्ये हिंसाचार होणं हे दु:खद असून कोणत्याही प्रकारच्या हिंसेची निंदा करत असल्याचे जेएनयूने म्हटले आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कुलुगुरूंकडे आपला अहवाल पाठवला आहे. आम्ही जेएनयूच्या कुलगुरुंसहित पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भातील अहवाल पाठवल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

दुसरीकडे हिंसाचाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक स्पेशल टीम बनवली आहे. पोलीस संचालकांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण माहिती मागवली आहे. जेएनयूमध्ये मोठ्या संख्येत पोलीस फौजफाटा तैनात आहे. पोलिसांनी जेएनयू कॅम्पसमध्ये फ्लॅग मार्च देखील केले. तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या गटात तणाव होता. आता स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सांगत आहेत.   

मुंबई-पुण्यात निदर्शनं

जेएनयूमधल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले आहेत. मुंबई-पुण्यातही या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं रात्रीच्या सुमारास कँडलमार्च काढम्यात आला. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यातील फिल्म अँन्ड टेल्व्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या सुमारास मोर्चा काढला. कोलकाता, अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्येही निदर्शनं करण्यात आली.

नेत्यांकडून चौकशीची मागणी

जेएनयूमधल्या हिंसाचारानंतर तिथे गेलेले स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या गुंडांनी आपल्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप, योगेंद्र यादव यांनी केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रुरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांनी तातडीने ही हिंसा थांबावी आणि शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल?, असा प्रश्न केजरीवील यांनी ट्विटद्वारे केला आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एम्समध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. तर दिल्लीतले भाजप खासदार मनोज तिवारी आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

जेएनयूचे विद्यार्थी तसंच शिक्षक आणि दिल्ली पोलिसांचे पीआरओ एम एस रंधावा यांच्यात मध्यरात्री दिल्ली पोलीस मुख्यालयात बैठक झाली. जखमींना वैद्यकीय सहाय्य आणि हल्लेखोरांना अटक करण्याची मुख्यमागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.