स्कॉर्पिओ चालकाला राग अनावर, भर रस्त्यात अशी उडवली बाइक; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

रस्त्यावर गाड्या चालवताना अनेकदा वाद होतात. मात्र काही वाद इतके विकोपाला जातात की, एका चुकीमुळे जीव जाईल याचीही पर्वा केली जात नाही. 

Updated: Jun 6, 2022, 12:56 PM IST
स्कॉर्पिओ चालकाला राग अनावर, भर रस्त्यात अशी उडवली बाइक; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद title=

नवी दिल्ली: रस्त्यावर गाड्या चालवताना अनेकदा वाद होतात. मात्र काही वाद इतके विकोपाला जातात की, एका चुकीमुळे जीव जाईल याचीही पर्वा केली जात नाही. दिल्लीतील हिट अँड रन प्रकरणाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिल्लीच्या रस्त्यावर दुचाकीस्वारांचा एक गट गाडी चालवताना दिसत आहे. मात्र दरम्यान एका दुचाकीस्वाराबाबत स्कॉर्पिओ चालकाचा वाद झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ चालकाला राग अनावर झाल्याने त्याने मुद्दाम गाडी वेगाने पळवत पुढे जात दुचाकीला कट मारली. त्यामुळे दुचाकीस्वाराचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाला धडकून तो पडला.

दिल्लीतील अर्जन गड मेट्रो स्टेशनच्या खाली रविवारी सकाळी ही घटना घडली. श्रेयांश असे दुचाकीला धडक दिलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो सुमारे २० वर्षांचा आहे. मित्रांसोबत दुचाकीने प्रवास करून तो दिल्लीला परतत होता. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून त्याचा तपास सुरू आहे. अनुराग आर अय्यर या सोशल मीडिया वापरकर्त्याने ट्विटरवर पंतप्रधान कार्यालय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे पोलीस उपायुक्त यांना टॅग करत व्हिडिओ पोस्ट केला आणि दावा केला की, कार चालकाने दुचाकीस्वाराला मारण्याचा प्रयत्न केला.

ट्विटरवर @anuragiyer नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ  शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'कृपया आम्हाला मदत करा, स्कॉर्पिओ कार चालकाने आमच्या काही सहकाऱ्यांना जवळपास मारले होते आणि आम्हाला कारखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. कोणीही गंभीर जखमी झाले नाही. दुचाकीस्वारांचा आदर करा. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.