चंदीगड : सरकारी नोकरीतून निवृत्तीचा दिवस बहुतेक सरकारी कर्मचारी अभिमानाचा मानतात. हरियाणातील फरीदाबादमध्येही माध्यमिक शाळेतून एक शिपाई, आपल्या ४० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाला. मात्र शेवटच्या दिवशी हा कर्मचारी हेलिकॉप्टरने शाळेतून घरी आला. नेहमी हा शिपाई मोटारसायकलीने घरी यायचा पण आज तो हेलिकॉप्टरने घरी आला. तो असा हेलिकॉप्टरने घरी का परतला यावर सध्या चर्चा होत आहे.
सादपुरा गावातील या शिपायाची ही अनेक दिवसापासून इच्छा होती की, एकदा तरी हेलिकॉप्टरमध्ये बसायचंय. कुरे रामने अनेकदा घरच्यांना हे स्वप्न बोलून दाखवलं, पण काहीही उपयोग नव्हता, त्याला सर्व जण तेवढं गंभीरतेने घेत नव्हते.
अखेर त्याने निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टर बूक केलं आणि निमका गाव जेथे शाळा आहे. तेथून २ किमी अंतरावरून हेलिकॉप्टरमध्ये बसून तो नोकरीच्या शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टरने घरी परतला.
कुरे रामचा भाऊ सरपंच आहे, त्याने सांगितलं की, कुरे राम यांच्यासाठी कुटूंबियांनी साडेतीन लाख रूपये जमवून ठेवले होते. यातून त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. असं नाही की आमच्याकडे जमीन आहे किंवा आम्ही खूप श्रीमंत आहोत, पण आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू शकतो हे आम्ही दाखवून दिलं.