state bank of india: आर्थिक व्यवहार आणि उलाढालींच्या हेतूनं तुमच्याआमच्यापैकी अनेकजण बँकांची वाट धरतात. अशा या आर्थिक उलाढाली आणखी सोईस्कर व्हाव्यात आणि खातेधारकांना Banking चा उत्तम अनुभव मिळावा यासाठी बँकांकडून सातत्यानं काही नव्या योजना आखल्या जातात. स्टेट बँकही त्यातील एक बँक. देशातील अग्रगण्य बँकांपैकी एक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं आता आणखी एक नवी आणि खातेधारकांच्या सोयीची योजना लाँच केली आहे. थोडक्यात इथं तुमचाच फायदा असल्याचं आता स्पष्ट होत आहे.
नुकतंच SBI कडून मोबाईल हँडहेल्ड डिवाईस लाँच करण्यात आलं आहे. जिथं बँकेकडून ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेल्या उपकरणांमधून विविध बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. एसबीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या दिनेश खारा यांनी याबाबतची माहिती देत चित्र अधिक स्पष्ट केलं. आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी सुसूत्रता आणत ते सक्षम करणं आणि सर्वसामान्यांपर्यंत सहजगत्या बँकेच्या सुविधा पुरवणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं.
एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या या निर्णयामुळं कियोस्क बँकिंग आता थेट खातेधारकांपर्यंत पोहोचणार असून त्यामुळं ग्राहक सेवा केंद्र (CSP) एजंट्सना जास्तीत जास्त फ्लेग्जीबिलिटी मिळू शकणार आहे. या सुविधेमुळं आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना सहजरित्या मदत मिळेल. बँकेकडून सुरुवातीला कॅश डिपॉझिट, फंड ट्रान्सफर, बॅलेन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि कॅश विथड्रॉवर अशा सुविधा पुरवण्यात येतील.
ही सेवा बँकेच्या सीएसपी (CSP)वर होणाऱ्या देवाणघेवाणीहून 75 टक्के अधिक आहे. बँकिंगची ओळख नसणाऱ्यांमध्ये बँकांचे व्यवहार आणि त्याचं महत्त्वं पटवून देत ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यावर एसबीआय भर देताना दिसत आहे. ही एक सुरुवातच असून, मोबाील हँडहेल्ड डिवाईसमुळं ग्राहकांना आहे त्या ठिकाणहून बँकिंगचा अनुभव अगदी सुकर होईल. ज्याचा फायदा बँकेच्या कोट्यवधी खातेधारक आणि ग्राहकांना होणार आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं बँक तुमच्या दारी आली, असं म्हणणं गैर ठरणार नाही.