नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना एक जोरदार झटका दिला आहे.
एसबीआयने नोव्हेंबर महिन्यापासून फिक्स्ड डिपॉझिट (FD)च्या दरांत कपात केली आहे. म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियात तुम्ही फिक्स डिपॉझिट करत आहात तर तुम्हाला व्याज दर कमी मिळेल.
एसबीआयचे नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची एफडी करणाऱ्यांच्या व्याज दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाहीये.
एसबीआयच्या नव्या व्याज दराचा सर्वाधिक फटका वरिष्ठ नागरिकांना बसणार आहे. वरिष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याज दरात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यासोबतच जर तुम्ही जुनी एफडी रिन्यूव्ह करणार आहात तर त्यासाठी मिळणारा व्याज हा नव्या व्याज दराप्रमाणेच असणार आहे.
काही दिवसांपूर्वी एसबीआयने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याज दरात कपात केली होती त्यानंतर इतरही बँकांनी व्याज दरात कपात केली होती. त्यामुळे बाजार तज्ञांच्या मते, आताही एसबीआयनंतर इतर बँकाही व्याज दरात कपात करु शकतात.