मुंबई : SBI hikes fixed deposit interest rates : दिवाळीआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिली आहे. एसबीआयनं फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केलीय. त्यामुळे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. व्याजदरात 0.10 टक्के ते 0.20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून दोन कोटींपेक्षा कमी एफडीवर नवीन व्याजदर लागू झाले आहेत. (State Bank of India (SBI) has increased interest rates of its fixed deposits (FDs) across all tenures by up to 20 basis points)
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD व्याजदरातील वाढ 10 बेसिस पॉइंट (bps) ते 20 bps पर्यंत आहे.
SBI ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्याचप्रमाणे 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 4 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी 3.90 टक्के व्याजदर होता. सुधारणेनंतर, किरकोळ देशांतर्गत मुदत ठेवींवरील 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीतील व्याजदर 4.55 टक्क्यांवरुन 4.65 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बँकेने 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 4.60 टक्क्यांवरून 4.70 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. SBI च्या किरकोळ देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदर एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या 5.45 टक्क्यांवरुन 5.60 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD साठी, व्याज दर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के करण्यात आला आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर, व्याजदर 5.60 टक्क्यांवरून 5.80 पर्यंत वाढवला आहे. पाच वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD साठी, व्याजदर 5.65 टक्क्यांवरून 5.85 टक्क्यांवर गेला आहे.
SBI ज्येष्ठ नागरिक FD व्याज दरात वाढ
बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी 20 आधार अंकांपर्यंत वाढ केली आहे. आता SBI मधील मुदत ठेवींवर वृद्ध ग्राहकाला किती व्याज मिळेल, ते पाहा. ज्येष्ठ नागरिकांसाठी, 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 15.10.2022 पासून 3.5 टक्के व्याजदर मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी 3.40 टक्के व्याजदर होता.