महागाईच्या काळात अशाप्रकारे करा स्वयंपाक गॅसची बचत, 'या' किचन ट्रीक ठरतील फायदेशीर

 तुम्ही स्वयंपाक घरात येथे दिलेल्या पद्धतीने अन्न शिजवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

Updated: Aug 18, 2022, 06:29 PM IST
महागाईच्या काळात अशाप्रकारे करा स्वयंपाक गॅसची बचत, 'या' किचन ट्रीक ठरतील फायदेशीर title=

मुंबई : महागाईच्या काळात एलपीजीच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांना रोजचा स्वयंपाक करणं कठीण झालं आहे. त्यामुळे जितकं शक्य होईल तितका गॅस कमी वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी कधी आवडीचे पदार्थ शिजवण्याचा मोह देखील आवरावा लागत आहे. पण तुम्ही स्वयंपाक घरात येथे दिलेल्या पद्धतीने अन्न शिजवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कारण यामुळे गॅसचा कमीत कमी वापर होईल आणि आवडीचे पदार्थही झटपट शिजवले जातील.

नॉन-स्टिक पॅन भांडी वापरा

गॅस वाचवण्यासाठी तुम्ही नॉन-स्टिक पॅन वापरू शकता. नॉन स्टिक पॅनमध्ये अन्न लवकर तयार होतं. तसेच तेलाचा वापर कमी करावा लागतो. त्यामुळे गॅस आणि तेलाची बचत होते.

फ्रीजमधून पदार्थ थेट बाहेर काढून शिजवू नका

दूध, भाजी किंवा फ्रीजमधून काढलेली कोणतीही वस्तू थेट गॅसवर ठेवू नका. किमान 1-2 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा. यामुळे थंड पदार्थ सामान्य तापमानात येतील. यानंतर ते पदार्थ गॅसवर गरम करा यामुळे गॅसचा वापर कमी होईल.

कोरड्या भांड्यात अन्न शिजवा

गॅसची बचत करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता. कारण अन्न शिजवण्यासाठी ओल्या भांड्याचा वापर केला तर ते भांडं गरम होण्यास वेळ घेईल आणि गॅसचा वापर जास्त होईल. त्यामुळे काहीही शिजवण्यापूर्वी भांडी कोरडी करून घ्या. त्यानंतर त्या भांड्यात अन्न तयार करा. याद्वारे तुम्ही स्वयंपाकाच्या गॅसची बचत करू शकाल.

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा

स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरचा वापर सर्वोत्तम पर्याय आहे. कारण प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजतं तसेच गॅसचा कमी वापर होतो. मसूर, मांस, चिकन आणि काही  भाज्या शिजवण्यासाठी जास्त गॅस लागतो. त्यामुळे अशा भाज्या किंवा मांस शिजवण्यासाठी नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्यात मांस किंवा चिकन शिजवा. कारण मायक्रोवेव्हमध्ये मांस किंवा चिकन लवकर शिजते.