मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत अयोध्येमध्ये पोहोचलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी राऊत रामजन्मभूमीत दाखल झालेत. राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्यासह अनेक संतांशी राऊत यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची घोषणा होणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासूनची परंपरा असलेल्या दसरा मेळावा आयोजनाची तयारी सुरु झालीय. यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री-नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा व्यवस्थापनाबाबत चर्चा केल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन जागेची पाहाणी केली. यावेळी पक्षाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिवडीचे आमदार अजय चौधरी तसंच स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्यावारी करणार आहेत. यावेळी ते रामजन्मभूमीलाही भेट देणार असून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या वारीच्या भेटीची तारीख जाहीर करणार आहेत. रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी अलिकडेच शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्याभेटीचं निमंत्रण दिलं. उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मंदिर निर्माणाबाबत चर्चा होणार आणि सर्वसहमतीनं निश्चित कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.