कोर्टात हजर राहायला साध्वी प्रज्ञांची तब्येत बिघडली, पण जाहीर कार्यक्रमावेळी मात्र ठणठणीत

साध्वी प्रज्ञा यांनी ऐनवेळी प्रकृतीचे कारण देत कोर्टात गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती केली होती.

Updated: Jun 7, 2019, 09:42 AM IST
कोर्टात हजर राहायला साध्वी प्रज्ञांची तब्येत बिघडली, पण जाहीर कार्यक्रमावेळी मात्र ठणठणीत title=

भोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत न्यायालयासमोर उपस्थित राहणे टाळले होते. न्यायालयात हजर होण्याच्या एक दिवस आधीच साध्वी प्रज्ञा ब्लडप्रेशर वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारीच साध्वी प्रज्ञा यांनी एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या एम.पी. नगर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण केला. 

तर बुधवारी संध्याकाळीही साध्वी प्रज्ञा या भाजप नेत्यांसह काजी सैयद मुस्ताक अली नदवी यांच्या घरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्या होत्या. साध्वी प्रज्ञा यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

साध्वी प्रज्ञा यांना गुरुवारी मुंबईतील एनआयए कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, साध्वी प्रज्ञा यांनी ऐनवेळी प्रकृतीचे कारण देत कोर्टात गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली होती. त्याऐवजी शुक्रवारी उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी आपला विनंती अर्ज सादर करताना साध्वी यांनी त्यासोबत कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामुळे साध्वी रुग्णालयात दाखल झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

यापूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी कोर्टात गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आता खासदार झाल्यामुळे त्यासंदर्भातील कामांचा व्याप वाढला आहे. त्यामुळे आपल्याला मुभा मिळावी, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली होती. 

साध्वी प्रज्ञा यांनी यावेळी भोपाळहून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत साध्वी प्रज्ञा यांनी तब्बल पावणेचार लाख मतांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.