मुंबई : Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आणि युक्रेनवर हल्ले चढवलेत. (Russia Ukraine Conflict) मात्र, या युद्धाचा परिणामामुळे भारतात मोठे पडसाद उमटणार आहेत. युक्रेन - रशियाच्या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते, अशी शक्यता आहे. कच्चे तेल आणि सोने महाग होण्याची शक्यता अधिक आहे.
युक्रेन - रशियाच्या युद्धामुळे युरोपियन देशावर परिणाम दिसून येणार आहे. यामुळे भारतात अनेक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली की, यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतात. तर एलपीजी, केरोसीन यांचे अनुदान वाढू शकते. रशिया-युक्रेन युद्धाचे पडसादामुळे कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्यावर गेले आहे. गेल्या 7 वर्षांतला उच्चांक आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीवर याचा परिणाम होणार आहे.
रशिया - युक्रेन युद्ध घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात कमालीची घसरण झाली. व्यवहार सुरू होताच निफ्टी तब्बल 500 अंकांनी कोसळला तर सेन्सेक्स जवळपास 1600 अंकांनी कोसळला. तर दुसरीकडे सोने दरातही वाढ झाली आहे. सोने दरात वृद्धी झाली असून सोन्याची वाटचाल 52 हजारांच्या दिशेने पोहोचली आहे.
दरम्यान, अखेर युरोपात युद्धाला तोंड फुटले आहे. रशियाने युक्रेनच्या डोनबास प्रदेशात हल्ल्यांना सुरूवात केली आहे. बंडखोरांनी विनंती केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशनचे आदेश दिले. युक्रेन आर्मीने तातडीने शस्त्र खाली ठेवावी, शरणागती पत्करावी अन्यथा परिणामांना सामोरं जावं असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. तर दुसरीकडे य़ुक्रेननं रशियाचं फायटर विमान पाडले आहे. 4 फायटर विमाने आणि 1 हेलिकॉप्टर पाडल्याचा युक्रेनचा दावा आहे.