राम मंदिरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेसाठी इंद्रेश कुमारांचा मोदींना पाठिंबा

दहशतवाद्यांसाठी रात्री-अपरात्रीही न्यायालयाचे कामकाज चालते. पण या विषयावर न्यायालय लवकर निकाल देत नाही.

Updated: Jan 3, 2019, 05:51 PM IST
राम मंदिरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेसाठी इंद्रेश कुमारांचा मोदींना पाठिंबा title=

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या मताला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि प्रचारक इंद्रेश कुमार यांनी पाठिंबा दिला आहे. मोदी यांनी या प्रश्नावर मत मांडताना त्यांची भावना व्यक्त केली आहे. आता तरी या प्रकरणावर न्यायालयाने लवकरात लवकर निकाल द्यावा. जर तसे झाले नाही तर लोक त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे त्यांनी म्हटले आहे. राम मदिराच्या प्रश्नी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल. या संदर्भात आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून राम मदिराच्या प्रश्नी वटहुकूम आणावा, अशी मागणी भाजपच्या मित्रपक्षांकडून आणि हिंदूत्त्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी यावर थेटपणे कोणतेही भाष्य केले नाही. आणि न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याचे सांगितले. 

इंद्रेश कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात गेल्या ३ वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. या प्रकरणी रोजच्या रोज सुनावणी घेऊन लवकर निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले होते. पण त्यावर पहिला अडथळा काँग्रेसने आणला. प्रभू रामचंद्र असे काहीही नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात दिले. जर राम नाहीये तर मग रामलीलाचे आयोजन का केले जाते. त्यानंतरही या खटल्यामध्ये अडथळे आणण्याचे काम मुस्लिम समाजातील काही जणांनी केले. नरेंद्र मोदी यांनी केवळ आपली भावना व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून त्यांना त्रास होत असल्याचेच दिसून येते. 

दहशतवाद्यांसाठी रात्री-अपरात्रीही न्यायालयाचे कामकाज चालते. पण या विषयावर न्यायालय लवकर निकाल देत नाही. राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. वसंत पंचमीला देशातील सव्वाशे कोटी जनतेने राम मंदिर निर्माणाचा जल्लोष करावा, अशीच आमची इच्छा आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात आंदोलन छेडू नये, असेच आम्हाला वाटते. त्यासाठी न्यायालयाने लवकरात लवकर निकाल द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.