जरा सनातन संस्कृती जपा! मॉडेलने कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यातच कापला बर्थडे केक; 39 सेकंदाच्या व्हिडीओमुळे संताप

व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिला मंदिरात प्रवेश केल्यानंतर केक कापताना दिसत आहे. यानंतर ती केकचा पहिला घास मूर्तीला देते. यानंतर एकच संताप व्यक्त होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2024, 07:53 PM IST
जरा सनातन संस्कृती जपा! मॉडेलने कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यातच कापला बर्थडे केक; 39 सेकंदाच्या व्हिडीओमुळे संताप title=

Viral Video: सध्या सोशल मीडियाचं युग असून आपला रील, व्हिडीओ व्हायरल व्हावा यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा तर ऊतच आला आहे. त्यातच अनेकदा व्हायरल होण्याच्या नादात सीमा ओलांडल्या जातात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने वाराणसीमधील प्राचीन काशी कोतवाल कालभैरव मंदिरात जाऊन वाढदिवसाचा केक कापला आहे. महिला केक कापण्यासाठी थेट गाभाऱ्यात पोहोचली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भक्त आणि धार्मिक प्रमुखांनी याचा निषेध केला आहे. 

व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचं नाव ममता राय आहे. व्हिडीओत ती मंदिर परिसरात चालताना आणि नंतर आत प्रवेश करताना दिसत आहे. गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर ती सर्व विधी करते. यानंतर देवाच्या मूर्तीसमोरच ती वाढदिवासाचा केक कापते. यावेळी त्यावर बर्थडे कँडलही दिसत आहे. केक कापल्यानंतर ती पहिला घास देवाला अर्पण करते. विशेष म्हणजे यामध्ये तिथे उपस्थित पुजारीदेखील सहभागी होताना दिसत आहेत. 

ममता रायचे इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत. शुक्रवारी हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर भक्तांकडून संताप व्यक्त होऊ लागला. महिलेने पवित्र गाभाऱ्यात जाऊन केलेलं कृत्य अनेकांना पटलेलं नसून, तिला न थांबवणाऱ्या पुजाऱ्यांविरोधातही राग व्यक्त होत आहे. 

काशी विद्धत परिषदेकडून नाराजी व्यक्त

काशी विद्धत परिषदेने या कृत्याचा निषेध केला असून, त्यावेळी उपस्थित महंतांना नोटीस पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. तसंच मंदिर प्रशासनाची बैठक बोलावून केक कापण्यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर बंदी घातली आहे. 

कालभैरव मंदिराच्या महंत परिवाराच्या वतीने झालेल्या बैठकीत आगामी काळात कोणत्याही कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात केक कापला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केक कापण्याचा विषय केवळ बाबा कालभैरवांच्या प्रकट उत्सव तिथी भैरव अष्टमीच्या निमित्ताने दिसून आला आहे. पण आजकाल असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात लोक त्यांच्या मोठ्या कार्यक्रमात मंदिर परिसरात उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

काशी कोतवाल कालभैरव मंदिराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काशी विद्वत परिषदच नव्हे तर अनेक धर्मगुरूंनीही यावर नाराजी व्यक्त करत हे सनातन संस्कृतीची प्रतिष्ठा भंग करण्यासारखे असल्याचं म्हटलं आहे. धार्मिक स्थळी विशिष्ट व्यक्तीशी संबंधित कोणत्याही प्रकारची घटना घडू नये. कोणत्याही मंदिराचे स्वतःचे वेगळेपण असते, लोक त्यांच्या स्वस्त लोकप्रियतेसाठी तेथे पोहोचतात आणि सोशल मीडियावर असे व्हिडिओ पोस्ट करतात असं सागंण्यात आलं आहे.