सुप्रीम कोर्टात पुन्हा वाद; वरिष्ठता डावलून न्यायमूर्तींची नियुक्ती

न्यायपालिकेची विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य जपा.

Updated: Jan 16, 2019, 01:04 PM IST
सुप्रीम कोर्टात पुन्हा वाद; वरिष्ठता डावलून न्यायमूर्तींची नियुक्ती title=

नवी दिल्ली: वरिष्ठता डावलून करण्यात आलेल्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायवृंदाने (कॉलेजिअम) नुकतीच न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयात बढती दिली होती. मात्र, ३२ न्यायाधीशांची वरिष्ठता डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कैलाश गंभीर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्रदेखील पाठवले आहे. 

न्यायमूर्ती खन्ना हे दिवंगत न्यायमूर्ती एच आर खन्ना यांचे भाचे असल्याची आठवण या पत्रात नमूद करण्यात आले आहे. न्यायमूर्ती खन्ना यांना आणीबाणीविरोधात निर्णय घेतल्यामुळे त्यावेळी डावलण्यात आले होते. न्यायमूर्ती खन्नांना त्यावेळी डावलणं हा न्यायपालिकेतला काळा दिवस म्हणून संबोधला गेला. त्याचप्रमाणे यावेळीही ३२ न्यायमूर्तींना डावलणं हा आणखी एक काळा दिवस असल्याची टीका निवृत्त न्यायमूर्ती कैलाश गंभीर यांनी पत्रात केली आहे. न्यायपालिकेची विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य जपा. तसेच ऐतिहासिक घोडचुकीची पुनरावृत्ती टाळा, अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.

१० जानेवारीला कॉलेजिअमने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती महेश्वरी हे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. तर न्या. संजीव खन्ना हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश आहेत.