नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याची कमाई पाहील्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. गुरमीत राम रहीम याची एका महिन्याची कमाई ही एखाद्या छोट्याशा कंपनीच्या वार्षिक कमाई पेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे.
राम रहीम एका दिवसाला जवळपास १६ लाख रुपयांची कमाई करतात. म्हणजेच त्यांची महिन्याची कमाई जवळपास ४ कोटी ८० लाख रुपयांच्या घरात पोहोचते.
भक्तांकडून मिळणा-या महागड्या वस्तूंची भेट, तसेच शेत जमिन, रुग्णालय, गॅस स्टेशन यांमुळे डेरा सच्चा सौदाची एकूण संपत्ती अरब रुपयांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेरा सच्चाकडे सिरसा येथे ७०० एकर जमिन आहे. तसेच बाबा राम रहीम याचे तीन रुग्णालय आहेत. ज्यापैकी एक राजस्थानच्या गंगानगरमध्ये १७५ बेड्सच्या रुग्णालयाचा समावेश आहे. डेरा एक आंतरराष्ट्रीय आय बँकही चालवतं. तसेच त्यांच्याकडे एक गॅस स्टेशन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सही आहे.
यासोबतच डेरा सच्चा सौदाच्या संपत्तीत डेराचं जुनं भवन आणि एसी मार्केट यांचा समावेश आहे. तसेच, शाह सतनाम सिंह बॉईज स्कूल, शाह सतनाम सिंह गर्ल्स स्कूल आणि शाह सतनाम सिंह गर्ल्स कॉलेज, शाह सतनाम सिंह बॉईज कॉलेज, क्रिकेट स्टेडियम, फाइव्ह स्टार हॉटेल, डेरा बाबाची गुफा (तेरावास), एमएसजी इंटरनॅशनल स्कूल, शाह सतनाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इतर कंपन्या, फिल्म सिटी सेंटर, माही सिनेमा, कशिश रेस्टॉरंट, बाग-बगीचे, डेराची शिक्षण संस्थाच्या गाड्या, इतर गाड्या आणि आश्रम यांचा समावेश आहे.
डेराने दावा केला आहे की, देशातच नाही तर परदेशातही त्यांचे जवळपास २५० आश्रम आहेत. कोट्यावधी समर्थक आहेत. गुरमीत राम रहीम हे म्युझिक कॉन्सर्ट आणि सिनेमांच्या माध्यमातूनही पैसे कमवतात. आतापर्यंत त्यांनी पाच सिनेमांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
२०१०-२०११ मध्ये डेराची एकूण वार्षिक संपत्ती १६ कोटी रुपये होती. हीच संपत्ती २०११-१२ मध्ये २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ही कमाई २९ कोटींपर्यंत पोहोचली.
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली आहे.