Rakshabandhan 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येतेय त्यांची बहीण!

Rakshabandhan 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही यंदाचं रक्षाबंधन खास. कारण, स्वत:च्या हातानं तयार केलेली राखी बांधण्यासाठी खुद्द बहिणच दिल्लीला येतेय.   

सायली पाटील | Updated: Aug 22, 2023, 11:26 AM IST
Rakshabandhan 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येतेय त्यांची बहीण! title=
rakhshabandhan 2023 Pm Modi Pakistani Sister Qamar Mohsin Sheikh Will Come To Delhi To Tie him Rakhi

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन, बहीण- भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा एक सण. अशा या सणाच्या निमित्तानं सध्या बाजार फुलले आहेत. विविधरंगी, विविध आकाराच्या आणि तितक्याच बहुविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी बाजारांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. अशा या खास दिवसाच्या निमित्तानं एक वेगळाच उत्साह सर्वत्र पाहता येणार आहे. याच रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक खास बातमीही समोर आली आहे. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हा पवित्र सण साजरा करणार आहेत. कारण, त्यांची बहीण थेट दिल्ली गाठणार आहे.  (PM Modi Sister)

मूळच्या पाकिस्तानच्या असणाऱ्या कमर मोहसिन शेख या लग्नानंतर भारतात आल्या. यंदाच्या वर्षी त्या रक्षाबंधनच्या दिवशी दिल्ली गाठणार आहेत. जवळपास तीस वर्षांहून अधिक काळापासून शेख पंतप्रधान मोदी यांना राखी बांधत आहेत, यंदाही त्या या खास दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर स्वत:च्या हातांनी तयार केलेली राखी बांधणार आहेत. 

स्वत: तयार केली राखी... 

'मी त्यांना रक्षाबंधनाच्या खुप साख्या शुभेच्छा देते', असं म्हणत कमर मोहसिन शेख यांनी आपण पंतप्रधानांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दर दिवशी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी धारणा असल्याचं सांगत जेव्हा ते मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली होते तेव्हाही त्यांना हे पद मिळालं होतं, पंतप्रधानपदाच्या वेळीही असंच झाल्याचं त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : Ladakh Road trip : बाईक, दऱ्या, बर्फ अन् निसर्ग... राहुल गांधींप्रमाणे 'लडाख रोड ट्रीप'ला जाण्याचा खर्च किती? 

पंतप्रधान मोदी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचं म्हणत यावेळी त्यांनी आपल्या या भावाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यंदाच्या वर्षी आपण स्वत: त्यांच्यासाठी राखी तयार केली असून, त्यासोबतच त्यांना शेतीविषयी आवड असल्यामुळं त्यांना एक पुस्तकही भेट देणार असल्याचं त्या म्हणाल्या. मागील दोन ते तीन वर्षांपासून कोविडमुळं आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही, पण यंदा मात्र मी त्यांना भेटणार असल्याचं म्हणत पंतप्रधानांच्या बहीणीनं आनंद व्यक्त केला. 

कोण आहेत कमर मोहसिन शेख? 

कमर मोहसिन शेख या पंतप्रधानांच्या मानलेल्या बहीण असून, त्या दरवर्षी आपल्या या प्रधानसेवक भावासाठी स्वत:च्या हातांनी राखी बनवतात. आताच नव्हे तर, मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असतानाही त्या त्यांना राखी बांधत होत्या. दरम्यानच्या काळात कोविडच्या लाटेमुळं त्यांना व्यक्तिगतरित्या दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना राखी बांधता आली नव्हती. ज्यामुळं त्यांनी पोस्टानं राखी पाठवली होती. थोडक्यात यंदाचं रक्षाबंधन तुमच्याआमच्याप्रमाणंच पंतप्रधानांसाठीही तितकंच खास आहे असं म्हणायला हरकत नाही.