नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. पटेल यांना पराभूत करण्यासाठी भाजपने कसलेली कंबर वाया गेली. पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
काल गुजरात राज्यसभेच्या दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री निवडणूक आयोगाने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेला गटातील दोन आमदारांचे मत रद्द करण्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या भोलाभाई आणि राघवजीभाई पटेल यांची मतं रद्दबातल ठरवली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. दोन मते बाद झाल्याने एकूण १७४ मतांची मोजणी झाली. त्यामुळे विजयासाठी ४४ मतांची आवश्यकता होती. यात भाजपाच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी ४६ मते मिळाली, तर अहमद पटेल यांनी भाजपाच्या सर्व राजकीय रणनीतीला मात देत ४४ मते मिळवून राज्यसभेसाठीचा रस्ता मोकळा केला.
भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितल्यानंतर राजधानी दिल्लीत अनेक घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत, अशी मागणी केली होती. ती निवडणूक आयोगानं मान्य केली. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली होती. त्यांच्या विजयाची बातमी कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.