जम्मू काश्मिरमध्ये पाच जवानांना वीरमरण; दहशतवाद्यांविरुद्ध सुरु होती कारवाई

Jammu and Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान लष्कराचे 5 जवान शहीद झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 5 मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती.

Updated: May 5, 2023, 08:06 PM IST
जम्मू काश्मिरमध्ये पाच जवानांना वीरमरण; दहशतवाद्यांविरुद्ध सुरु होती कारवाई title=

Jammu and Kashmir Encounter : जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) सुरु असलेल्या चकमकीमध्ये आता पर्यंत पाच जवानांना वीरमरण आलं आहे. शुक्रवारी सकाळी ही चकमक सुरु झाली असून अद्यापही कारवाई सुरुच आहे. या घटनेनंतर भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी संपूर्ण परिसर सील केला आहे, मात्र या भागात दहशतवाद्यांनी पेरलेली शस्त्रे आणि स्फोटके मोठ्या प्रमाणात असल्याने लष्कराला त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. आतापर्यंत अनेक दहशतवादी मारले गेले असले तरी नेमका आकडा समोर आलेला नाही. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह आणि अतरिक्त महासंचालक मुकेश सिंह हेही चकमकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याने बॉम्बस्फोट केला, ज्यात दोन जवान शहीद झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. चार जखमींमध्ये तीन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र 3 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राजोरीच्या कांडी भागात शुक्रवारी सकाळीच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होते. या घटनेबाबत लष्कराने एक निवेदन जारी करून सुरुवातीला म्हटले होते की, "चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर जखमी जवानांना कमांड हॉस्पिटल उधमपूरमध्ये नेण्यात आले आहे. यातील तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे." 

कारवाईसाठी केलेल्या जवानांचा मृत्यू

20 एप्रिल रोजी राजौरी सेक्टरमधील पुंछहून भिंबरकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. यामध्ये 5 जवान शहीद झाले होते आणि एक जवान जखमी झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर सतत तपास करत आहे. 3 मे रोजी, गुप्त माहितीच्या आधारे, सैन्याने राजौरीच्या कंडी जंगलात संयुक्त कारवाई सुरू केली. त्यानंतर 5 मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शोध पथकाने गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढले आणि कारवाई सुरु केली.

या भागात तीव्र उतार तसेच दाट झाडी आहेत. खराब हवामान आणि संततधार पाऊसात ही चकमक सुरू होती. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी बॉम्बचा स्फोट केला. यावेळी लष्कराच्या जवानांसोबतच काही दहशतवादीही मारले गेले आहेत. यानंतरही ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे.