रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू

Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 13, 2023, 10:59 AM IST
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू title=

Accident News : राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमध्ये (Bharatpur) बुधवारी पहाटे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. ट्रकने बसला धडक दिल्याने 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जयपूर आग्रा हायवेवर (Jaipur-Agra National Highway) हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की प्रवाशांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते.

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात पहाटे 4.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेनंतर बसमध्ये प्रवास करणाऱ्या 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतपूरच्या नादबाईमध्ये हा अपघात झाला. जखमींना भरतपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हंटारा पुलावर ट्रकने बसला धडक दिली.  मृतांमध्ये 6 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी गुजरातमधील भावनगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

जयपूर-आग्रा महामार्गाजवळ भरतपूरच्या हंटारा येथे हा अपघात झाला. मृतांची संख्या डझनभर आहे. मात्र, ही संख्या वाढू शकते. बसमध्ये 57 जण होते जे मथुरेला पर्यटनासाठी जात होते. पोलीस कछावा घटनास्थळी पोहोचले आहेत, अशी माहिती भरतपूरचे पोलीस अधीक्षक मृदुल कछावा यांनी एएनआय दिली आहे. पोलीस अधीक्षक मृदुल कछावा यांनी अपघाताच्या ठिकाणाला भेट देत घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस भावनगरहून मथुरामार्गे हरिद्वारला जात होती. भरतपूर-आग्रा महामार्गावर सकाळी अचानक बसचा डिझेल पाइप फुटला. त्यामुळे चालकासह 10 ते 12 प्रवासी बसमधून खाली उतरले. पाईप दुरुस्त करून चालक डिझेल घेण्यासाठी निघून गेला होता. त्यानंतर एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली आणि शेजारी उभ्या असलेल्या लोकांना चिरडत पुढे गेला. त्यानंतर तिथून जाणाऱ्या इतर वाहनांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचत रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, मृतांमध्ये अंतुभाई लालजी (55), नंदराम मयूर (68), कल्लो बेन (60), भिखा भरत, लल्लू दया, मंजीभाई लालजी, अंबा झीना, कंबू   मधु बेन, अंजू, मधु लालजी चुडासामा यांचा समावेश आहे. हे सर्व गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील दिहोर येथील रहिवासी आहेत