उभ्या कंटेनरला बलेरोजी धडक; ८ ठार, २ गंभीर जखमी

प्राथमिक चौकशीत हे कुटुंब राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण राजस्थानमधून उत्तर प्रदेशमधील नीमसार येथे देवदर्शनासाठी निघाले होते.

Updated: Jul 11, 2018, 09:57 AM IST
उभ्या कंटेनरला बलेरोजी धडक; ८ ठार, २ गंभीर जखमी  title=

कन्नौज: उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे आगरा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील ८ लोक जागीच ठार झाले. तर, इतर दोघे गंभीर जखमी आहेत. उभ्या असलेल्या कंटेनरला बलेरो गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व मृत हे राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

चालकाला डुलकी लागली आणि...

पोलिसांनी सांगितले की, बलेरोमधून प्रवास करत असलेल्यांपैकी केवळ २ व्यक्ती जिवंत (गंभीर जखमी) आहेत. बाकी सर्वांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक चौकशीत हे कुटुंब राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण राजस्थानमधून उत्तर प्रदेशमधील नीमसार येथे देवदर्शनासाठी निघाले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास हे लोक कन्नौजजवळ पोहोचले होते. दरम्यान, गाडी चालवत असताना चालकाला डुलकी आली आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली गाडी थेट कंटेनरला धडकली आणि अपघात घडला. 

प्रचंड आवाजामुळे लोक घटनास्थळी

अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्व लोकांना बाहेर काढले. पण, त्यापैकी आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.