आता माघार नाही; सचिन पायलट यांचा राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार

काँग्रेस आणि आपल्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नसल्याचेही पायलट यांनी स्पष्ट केले. 

Updated: Jul 13, 2020, 07:59 PM IST
आता माघार नाही; सचिन पायलट यांचा राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार title=

नवी दिल्ली: सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता अजूनही कायम आहे. काहीवेळापूर्वीच प्रियांका गांधी Priyanka Gandhi आणि काँग्रेसच्या नेत्यांना सचिन पायलट यांची मनधरणी करण्यात यश आल्याची चर्चा होती. मात्र, आता  सूत्रांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार सचिन पायलट Sachin Pilot यांनी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यास नकार दर्शविल्याचे समजते. एवढेच नव्हे तर त्यांनी राहुल गांधी Rahul Gandhi आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्तही पायलट यांनी फेटाळून लावले आहे. तसेच काँग्रेस आणि आपल्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नसल्याचेही पायलट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता काँग्रेसकडून काय पाऊल उचलले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेसने राजस्थान वाचवले पाहिजे, अन्यथा देशभरात वेगळा संदेश जाईल- राऊत

तत्पूर्वी आज जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला १०९ आमदार उपस्थित असल्याचे समजते. या सर्वांकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या परतीचे सर्व दोर कापले गेल्याची चर्चा आहे. 

पक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार; सचिन पायलटांना काँग्रेसचे दरवाजे बंद?

जयपूरमधील बैठकीनंतर कोणताही दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात आले आहे. जेणेकरून वेळ पडल्यास विधानसभेत बहुमत सिद्ध करणे काँग्रेसला अवघड जाणार नाही. मात्र, या आमदारांना राज्यपालांकडे नेण्याऐवजी हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले, असा सवालही उपस्थित झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला अजूनही बहुमताविषयी शंका असल्याची चर्चा आहे. परिणामी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजूनही सचिन पायलट यांचीही मनधरणी सुरु असल्याचेही सांगितले जात आहे. 

तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी आज जयपूरमध्ये केलेले शक्तीप्रदर्शन सचिन पायलट यांच्यासाठी इशारा असल्याचा काही जाणकारांचा अंदाज आहे. पायलट यांच्याकडे गेहलोत यांच्यापेक्षा कमी आमदारांचे पाठबळ असल्याचे सिद्ध झाल्याने आता पक्षातील त्यांचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे.