वर्गमित्रांनी मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघवी आणि...; राजस्थानातील धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime : राजस्थानच्या भिलवाडामध्ये एका शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.  

आकाश नेटके | Updated: Aug 1, 2023, 08:36 AM IST
वर्गमित्रांनी मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघवी आणि...; राजस्थानातील धक्कादायक प्रकार title=

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये (Rajasthan News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या भीलवाडामध्ये (Bhilwara district) शाळकरी मुलीच्या बाटलीत लघवी (urine) भरल्याने खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करत हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्य लघवी भरून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची बातमी लोकांना समजताच एकच गोंधळ उडाला. लोक रस्त्यावर आले आणि गोंधळ घालू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी (Rajasthan Police) लोकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

भिलवाडाच्या लुहारिया गावातील एका शाळकरी मुलाने एका मुलीच्या पाण्याच्या बाटलीत लघवी मिसळल्याचा दावा केल्यानंतर खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी वरिष्ठ उच्च माध्यमिक विद्यालयातील पीडित विद्यार्थिनीने चुकून लघवी प्यायल्याचाही दावा करण्यात येत आहे. यानंतर संपूर्ण परिसरात जोरदार आंदोलन आणि गदारोळ सुरू झाला होता. हा गोंधळ इतका वाढला की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.मुलाने आठवीच्या विद्यार्थिनीच्या पिण्याच्या बाटलीत लघवी केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष पसरला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार मुलाने मुलीच्या बॅगेत एक प्रेमपत्र देखील ठेवलं होतं.

भिलवाडा येथील लुहारिया गावातील सरकारी माध्यमिक शाळेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पाण्याच्या बाटली लघवी भरून गैरवर्तन केल्याने समजताच ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यानंतर लुहारियाच्या सरकारी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. आरोपी विद्यार्थ्याला शाळेतून हाकलून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शुक्रवारी लुहारिया गावातील सरकारी वरिष्ठ उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तक्रार केली की ती जेवणासाठी घरी गेली होती. त्यावेळी तिने दप्तर शाळेतच सोडले होते. काही मुलांनी पिशवीत ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीत लघवी केली होती. ते प्यायल्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने मुलीने याबाबत तक्रार केली. यासोबत तिच्या बॅगेत एक प्रेमपत्रही ठेवले होते, ज्यामध्ये आय लव्ह यू असे लिहिले होते, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम शर्मा यांनी दिली.

दरम्यान, घनश्याम शर्मा म्हणाले की, विद्यार्थिनीच्या तक्रारीवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावरून सोमवारी शाळा सुरू झाल्यावर संतप्त झालेल्या लोकांनी लुहारिया पोलीस ठाण्याचे प्रभारी व शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने गावकऱ्यांनी दगडफेक सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले.