दिल्ली : उत्तर भारतात पावसाने थैमान घातलं आहे. तर 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत देखील काल काही ठिकाणी पावसाने हजरी लावली होती. तर पावसासोबतच दाट धुक्यामुळेही लोकांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
IMD दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा कहर कायम राहणार आहे. रविवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडू शकतो. मात्र, त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी होईल.
दुसरीकडे, मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व भारत आणि छत्तीसगडमध्ये 11 जानेवारीपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.
IMDच्या म्हणण्याप्रमाणे पावसासोबतच नागरिकांना दाट धुक्याचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 24 तास धुकं रहाणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी.
यावेळी दिल्लीत जानेवारीमध्ये झालेल्या पावसाने 22 वर्ष रेकॉर्ड तोडला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत 41 मिमी पाऊस पडला. दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.
आयएमडीच्या म्हणण्याप्रमाणे, हवामानातील बदल आणि चक्रीवादळांची वाढती संख्या यामुळे पाऊस पडतोय.