उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल

तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. 

Updated: May 24, 2020, 08:04 PM IST
उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल title=

नवी दिल्ली: स्थलांतरित मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारीच केंद्र सरकार महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात श्रमिक ट्रेन पाठवत नसल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी महाराष्ट्रात १२५ श्रमिक ट्रेन पाठवत असल्याची घोषणा केली. मात्र, यावेळी गोयल यांनी उद्धव ठाकरेंना शाब्दिक चिमटाही काढला आहे. 

लोक मेल्यावर पाणी पाजायला येणार का? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर शेलारांची टीका

पियूष गोयल यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, उद्धवजी तुमची प्रकृती उत्तम आहे, अशी आशा करतो. उद्या आम्ही महाराष्ट्रासाठी १२५ श्रमिक विशेष ट्रेन सोडायला तयार आहोत. तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, या ट्रेन कुठून सोडायच्या, स्थलांतरित मजुरांचा तपशील, त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे असा सगळा तपशील एका तासाच्या आत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे पाठवावा. जेणेकरून आम्हाला या ट्रेन्सच्या फेऱ्यांचे नियोजन करता येईल. तुम्ही जितक्या ट्रेनची मागणी कराल, त्याची व्यवस्था केली जाईल. फक्त या ट्रेन खाली परतता कामा नये, एवढीच माझी विनंती असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. 

कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री

दरम्यान, श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्या मजुरांच्या तिकिटांचा खर्च सध्या केंद्र आणि राज्यातील वादाचा मुद्दा ठरत आहे. एकीकडे केंद्र सरकार आम्ही या ट्रेनच्या तिकिटाची ८५ टक्के रक्कम भरत असल्याचा दावा करत आहे. तर राज्य सरकारने हा दावा फेटाळला होता. आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७५ कोटी रुपये रेल्वेला या मजुरांच्या तिकीटासाठी दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.