नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नीतीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यावर टीका केलीय. यासोबतच नीतीश कुमारांनी आपली 'चर्चित' भेट का घेतली होती, हेही त्यांनी उघड केलंय.
'नीतीश कुमार मला भेटले होते... त्यांनी विश्वासघात केलाय. अशी खलबतं सुरू असल्याची आम्हाला चूणचूण तीन-चार महिन्यांपासून लागली होती... आपल्या स्वार्थासाठी हा माणूस काहीही करू शकतो. कोणतंही नियम त्याला नाहीत. सत्तेसाठी कुणी काहीही करतंय' असं म्हणत सत्तास्थापनेसाठी नीतीशकुमारांनी आपलीही भेट घेतल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, तेजस्वी यादव यांच्यावर होणाऱ्या आरोपांदरम्यान नीतीश कुमार यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदींद्वारे आयोजित भोजन समारंभात सहभागी होण्यापूर्वी शनिवारी नीतीश यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
यावेळी दोघांनी बिहारचं राजकारण आणि महागठबंधनाच्या भविष्यावर चर्चाही केली होती. लालूंशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नीतीश यांनी घेतलेली राहुल गांधीची चर्चेचा विषय ठरली होती. ही भेट जवळपास ४० मिनिटे सुरू होती.