नवी दिल्ली: राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना चर्चेसाठी बोलावले आहे. संध्याकाळी ५.३०च्या सुमारास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत काय होणार, यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे भविष्य अवलंबून आहे.
'सरकार पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आमदारांना २५ कोटीची ऑफर'
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन पायलट या बैठकीला जातील की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. पायलट या बैठकीला गेले तर या सगळ्या नाराजी नाट्यावर पडदा पडेल. मात्र, सचिन पायलट या बैठकीला गेले नाहीतर ते आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.
सचिन पायलट रविवारी सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेल्या सचिन पायलट यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी फारसे जुळत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. मात्र, हा वाद विकोपाला पोहोचला आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी केल्याचे समजते. यावेळी सचिन पायलट यांच्यासोबत काँग्रेसचे तब्बल २२ आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे अशोक गेहलोत यांचे सरकार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राजस्थानमध्येही असाच राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले होते. अशोक गेहलोत यांच्याकडून आपल्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न होत असल्याचा सचिन पायलट यांचा आरोप आहे. पायलट यांनी ही गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातली होती. मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्याने आता सचिन पायलट भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.