नवी दिल्ली : कोरोना व्हायरस, लॉकडाऊनमुळे देशाच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिन्यापासून व्यवहार कमी होत असून याचा अनेक कंपन्यांना मोठा फटका बसतो आहे. लॉकडाऊनचा फटका डी मार्टलाही बसला आहे. डी मार्टची चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारी समोर आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत डी मार्टच्या नफ्यात 88 टक्क्यांची घट झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे एप्रिल ते जूनच्या तिमाहीत डी मार्टला 40 कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच एप्रिल-जून तिमाहीत कंपनीला 323.06 कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात महसूल 33.21 टक्क्यांनी कमी होऊन तो 3,883.18 कोटींवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 5814.56 कोटी इतका होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेविल नोरोन्हा यांना सांगितलं की, देशभरात कोरोनाचा प्रभाव आहे. या तिमाहीत, आर्थिक कामगिरीवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत महसूल, नफा कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.