मोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी

आज देश जळतोय. देशाची वाट लागली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

Updated: Dec 14, 2019, 02:06 PM IST
मोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी होती. ती डबघाईला आणली आहे. देश तरुणांच्या हातात असेल, तर विकास शक्य आहे. शेतकरी, कामगारांशिवाय देशाचा विकास शक्य नाही. कारण नसताना नोटबंदी देशावर लादली. कर जनतेकडून घेतला आणि कर्ज कोणाची माफ झालीत, तर ती कर्ज उद्योगपतींची माफ केलीत. केवळ अदाणी समूहाला केंद्र सरकारकडून १ लाख कोटींची कंत्राटे दिली गेलीत. उद्योगपतींचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले. सामान्य मात्र संकाटात आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी गेला. 

बेरोजगारांची संख्या वाढवली - प्रियांका गांधी

सुधारीत नागरिकत्व कायदा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेसने रामलीला मैदानावर 'भारत बचाव' रॅलीचे (Bharat Bachao Rally) आयोजन केले होते. या रॅलीत  उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी अत्यंत आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल चढवला. आज देशाचा विकासदर ९ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांवर आला आहे.  एकट्या नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली

आज देशात हिंसाचार वाढला आहे. ईशान्य भारतात मोदींमुळे जाळपोळ होत आहे. देशाला आजची परिस्थिती माहित आहे. ईशान्येकडील आसाम, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये धर्माच्या नावाखाली विभाजन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेथे जाऊन नरेंद्र मोदींनी काय केले. तर त्यांनी त्या प्रदेशांना आग लावली आहे. मोदी प्रसिद्धीसाठी काहीही करतात. ते दिवसातील अनेक तास टीव्हीवरच दिसत असतात, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

मी राहुल सावरकर नाही, गांधी आहे. माफी मागणार नाही. काँग्रेस कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही. सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जात आहे. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे, असा घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केला. त्याचवेळी काँग्रेसवाले 'बब्बर शेर' आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

देशातील वाढत्या बलात्काराबद्दल सरकार टीका करताना राहुल यांनी एका सभेत 'मेक इन इंडिया'चा प्रवास 'रेप इन इंडिया'च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरले होते. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती. त्याला राहुल गांधी यांनी जाहीर उत्तर दिले.