नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घोटाळा केल्याचा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. फ्रान्सकडून भारतानं विकत घेतलेल्या राफेल विमानाच्या सौद्याबाबत माहिती द्यायला मोदी सरकारनं नकार दिलाय.
या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या व्यवहारातल्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका 'विश्वसनीय' व्यक्तीसोबत जाऊन स्वतः हा करार केला होता. मात्र राष्ट्रीय सुरक्षेसाठी या व्यवहाराचे तपशील देता येणार नाहीत, असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय.
हा करार करताना जुने निकष बदलले गेले. या व्यवहाराचे तपशील संसदेतही सादर होत नसतील, तर या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. हा व्यवहार करताना पंतप्रधानांसोबत असलेली ती विश्वसनीय व्यक्ती कोण, याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे बोलताना दिसत नाही, असे राहुल म्हणालेत.