पणजी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. राहुल गांधी कुटुंबियांसमवेत सुटीसाठी सध्या गोव्यामध्ये आले आहेत. यावेळीच त्यांनी मंगळवारी अचानक पर्रिकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. केवळ पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी आले होते. दोघांमध्ये दोन मिनिटे चर्चा झाली.
पर्रिकर यांच्यावर कर्करोगाचे उपचार सध्या सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी आले होते, असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी सध्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत सुटीसाठी गोव्यामध्ये आले आहेत. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर काल प्रसिद्ध झाले होते. मध्यंतरी राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पर्रिकरांवरही आरोप केले होते. पर्रिकरांकडे संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार असल्यामुळे या कराराची माहिती पर्रिकरांना असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीने राहुल गांधी यांनी स्वतःहून पर्रिकरांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी यांनी ही भेट घेतली.
राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी राफेलचा मुद्दा लावून धरतील, असे चित्र आहे.