लखनऊ : अयोध्या, काशी आणि मथुरेनंतर आता कुतुबमिनारवरूनही वादाची ठिणगी पेटलीय. हिंदू मंदिर पाडून त्याठिकाणी कुतुब मिनार उभारण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय. याप्रकरणी जून महिन्यात कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे. नेमका काय आहे हा वाद, चला पाहूयात. (qutub minar vishnu stambh controversy know what is exact matter)
काशीतल्या ज्ञानवापी आणि मथुरेतल्या ईदगाह मशिदीवरून चांगलाच वाद रंगलाय. त्यात आता भर पडलीय ती दिल्लीतल्या कुतुब मिनाराची. हा कुतुब मिनार आहे की विष्णू स्तंभ? २७ मंदिरं तोडून कुतूब मिनार उभारण्यात आला आहे का? याचा फैसला येत्या 9 जूनला दिल्लीतील साकेत कोर्ट सुनावणार आहे.
देवी देवतांच्या मूर्ती तोडून इथं मशीद बांधल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय. या परिसरात श्री गणेश, विष्णू, यक्ष अशा देवदेवतांच्या मूर्ती असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळं कुतुब मिनार परिसरात पूजाअर्चेला परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय.
तर हे संरक्षित स्मारक असल्यानं तिथं हिंदू-मुस्लीम कुणालाही पूजा किंवा नमाजाची परवानगी देऊ नये, अशी भूमिका पुरातत्व विभागानं कोर्टात मांडलीय.
देशातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक इमारतींपैकी एक असलेली कुतुब मीनारची ही वास्तू. दक्षिण दिल्लीच्या महरौली भागात 1199 ते 1220 या काळात 238 फूट उंचीचा कुतूब मिनार उभारण्यात आला.
या स्तंभाच्या आसपास अन्य स्मारकं देखील आहेत. त्यामुळं या भागाला कुतुब मिनार परिसर म्हणतात. कनिष्ठ कोर्टानं इथं पूजेला परवानगी देण्यास नकार दिला होता. आता साकेत कोर्ट काय निर्णय देतं, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.