Farmer Protest: 'पैसा आणि नोकरी तुमच्याकडेच ठेवा,' मृत आंदोलनकर्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाने 1 कोटी रुपये नाकारले

Farmer Protest: पंजाब-हरियाणा सीमेवर झालेल्या झटापटीत 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंगचा मृत्यू झाला आहे. यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 23, 2024, 03:44 PM IST
Farmer Protest: 'पैसा आणि नोकरी तुमच्याकडेच ठेवा,' मृत आंदोलनकर्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाने 1 कोटी रुपये नाकारले  title=

Farmer Protest: पंजाब-हरियाणा सीमेवर झालेल्या झटापटीत 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंगचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक संतापले असून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दल खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यादरम्यान राज्य सरकारने शुभकरण सिंगच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण शुभकरण सिंगच्या कुटुंबाने ही मदत नाकारली आहे. 

राज्य सरकारने शुभकरण सिंगच्या कुटुंबासाठी 1 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण कुटुंबाने ती नाकारत म्हटलं आहे की, "आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय हवा आहे. तो न्याय नोकरी किंवा पैशांनी मिळणार नाही". यादरम्यान शेतकरी नेत्यांनी जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करु देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी 22 वर्षीय शुभकरण सिंग याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, त्यांना जोपर्यंत शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही असं सांगितलं आहे. "नुकसान भरपाईशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही आवाज दिला तर जगभरातील शेतकरी त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावत येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पंजाब सरकार जाणुबुजून उशीर करत असल्याचा आरोप भारतीय किसान युनिअनचे अध्यक्ष जगजीत सिंग डल्लेवाल म्हणाले आहेत. 1 कोटींची नुकसान भरपाई देत पंजाब सरकार उशीर करण्याचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "पंजाब सरकारने फक्त नुकसान भरपाईवर लक्ष्य केंद्रीत करु नये. त्यांना शुभकरणच्या कुटुंबावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या शहीदाला न्याय देणं ही आमची प्राथमिकता आहे. पंजाब सरकार किती लवकर एफआयआर दाखल करतं त्यार ते अवलंबून आहे," असं ते म्हणाले आहेत. 

जगजित सिंग डल्लेवाल यांनी आरोप केला की, हरियाणाच्या सुरक्षा दलांनी अनेक शेतकऱ्यांना फरफटत नेलं. "आमच्या पाच शेतकऱ्यांना हरियाणाच्या सुरक्षा दलांनी फरफटत नेलं. त्यांना हरियाणातील अज्ञात ठिकाणी नेलं. यापूर्वी दोघांना नेण्यात आलं होतं. पंजाब सरकारने हरियाणाला आमच्या मुलांना परत आणण्यास सांगण्याचं धाडस केलं पाहिजे," असे ते म्हणाले आहेत.

शुभकरण सिंगने बहिणीच्या लग्नासाठी काढलं होतं कर्ज

शुभकरण सिंगने शेतकरी मोर्च्यात सहभागी होण्यासाठी घर सोडलं होतं. शुभकरणच्या आईचं निधन झालं असून, वडील मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्याल दोन बहिणी असू एक विवाहित आहे. दुसऱ्या बहिणीचं शिक्षण सुरु आहे. शुभकरणने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं.