'पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नाही' CM चन्नी यांचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीवरुन भाजपने पंजाब सरकारवर टीकेची झोड उठली आहे

Updated: Jan 5, 2022, 08:17 PM IST
'पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नाही' CM चन्नी यांचं स्पष्टीकरण  title=

पंजाब : पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही  भटिंडा इथं पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी जाणार होतो. पण ज्यांना माझ्यासोबत जायचं होतं त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मी पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी जाऊ शकलो नाही, पण पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि आमचे आमदार मंचावर पंतप्रधानांची वाट पाहत होते.

'मार्ग बदलाबाबत माहिती नाही'
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, खराब हवामान आणि होणारा विरोध यामुळे आम्ही त्यांना (PMO) दौरा रद्द करण्यास सांगितले होतं. त्यांनी अचानक मार्ग बदलला याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती. असं मुख्यमंत्री चन्नी यांनी स्पष्ट केलं. सीएम चन्नी म्हणाले की, मी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांवर लाठी किंवा गोळ्या चालवू शकत नाही.

'राजकारण करू नका'
सुरक्षेमध्ये कोणतीही चूक झालेली नाही आणि झाली असली तरी आम्ही तपास करण्यास तयार आहोत. आम्हाला आपल्या पंतप्रधानांचा आदर आहे. पंजाबचे लोक घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर करतात, ते आपल्या पंतप्रधानांना कोणताही धोका पोहचवू शकत नाहीत. त्याचवेळी सीएम चन्नी म्हणाले की, पंतप्रधानांना काही धोका असेल तर मी आधी माझे रक्त द्यायला तयार आहे. याशिवाय पंजाब पोलीस सर्वांचे रक्षण करण्यास सक्षम असल्याची ग्वाही सीएम चन्नी यांनी दिली.