नवी दिल्ली : देशभरात शेतकरी कर्जमाफीसाठी तळमळत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची कर्ज माफी दिली जात नसताना, दुसरीकडे सरकारी बँकांनी कर्ज थकवलेल्या कंपन्यांचं कर्ज, माफ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे 'कर्ज बुडव्या कंपन्या तुपाशी आणि शेतकरी उपाशी' अशी स्थिती झाली आहे.
सरकारी बँकांनी चालू आर्थिक वर्षात, पहिल्या ६ महिन्यात, ५५ हजार ३५६ कोटी रूपयांचं कर्ज माफ केलं आहे. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने पहिल्या पानावर छापली आहे. हे कर्ज मागील वर्षी याच दरम्यान माफ करण्यात आलेल्या, म्हणजे बुडीत खात्यात टाकण्यात आलेल्या, कर्जाच्या ५४ टक्के असल्याचंही इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे.
आर्थिक मंदी डोळ्यासमोर ठेवून, कंपनी आणि प्रमोटर्स कर्ज भरू शकत नसल्याचं दिसून आलं आहे. म्हणून हे कर्ज बुडीत खात्यात टाकून बँका आपलं आर्थिक रेकॉर्ड सुधारण्यात लागलेल्या आहेत.