देशाच्या चौकीदाराने चोरी केलीय; राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

सर्व मंत्री मोदींचा बचाव करत आहेत.

Updated: Sep 22, 2018, 03:44 PM IST
देशाच्या चौकीदाराने चोरी केलीय; राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका title=

नवी दिल्ली: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा होलांद यांच्या खुलाशामुळे राफेल विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून देशाच्या चौकीदाराने चोरी केल्याचे सिद्ध होते, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते शनिवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. इतके आरोप होऊनही पंतप्रधान मोदी याविषयी मौन बाळगून आहेत. अरूण जेटली आणि निर्मला सितारामन यांच्यासारखे मंत्री याप्रकरणात मोदींचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केल्याची आम्हाला खात्री आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा होलांद यांचा दावा खरा आहे की खोटा आहे, याचे स्पष्टीकरण पंतप्रधानांनी द्यायलाच पाहिजे. तसेच संयुक्त संसदीय समितीद्वारे या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केले. 

फ्रान्समधील एका संकेतस्थळाने फ्रान्स्वा होलांद यांच्या हवाल्याने राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचा ऑफसेट भागीदार म्हणून भारताकडून रिलायन्सचे नाव सुचवण्यात आल्याचे वृत्त दिले होते. होलांद यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.