Video : "अजूनही तोच संकल्प..."; पंतप्रधान मोदी यांनी शेअर केल्या 21 वर्षांपूर्वीच्या आठवणी

पंतप्रधान मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय

Updated: Oct 22, 2022, 10:01 AM IST
Video : "अजूनही तोच संकल्प..."; पंतप्रधान मोदी यांनी शेअर केल्या 21 वर्षांपूर्वीच्या आठवणी  title=
(फोटो सौजन्य - ट्विटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शुक्रवारी उत्तराखंडच्या (Uttarakhand) दौऱ्यावर होते. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी ते केदारनाथ मंदिरात (kedarnath temple) पोहोचले होते. यावेळी त्यांनी मंदिरात प्रार्थना केली. यानंतर ते बद्रीनाथ मंदिरात (Badrinath Temple) पोहोचले आणि तेथे पूजा केली. बद्रीनाथच्या माना गावात (mana village) त्यांनी रस्ते आणि रोपवे प्रकल्पांची पायाभरणी केली. यादरम्यान त्यांनी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) उत्तराखंड दौऱ्यादरम्यान मोदी अर्काइव्ह नावाच्या त्यांच्या ट्विटर (twitter) अकाऊंटवरून त्यांचा 21 वर्षे जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्रीही झाले नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनी उत्तराखंडला (Uttarakhand) जाऊन तेथील जनतेला संबोधित केले होते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या उत्तराखंड दौऱ्यानिमित्त हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. (Prime Minister Narendra Modi shared his 21 year old video)

काय म्हटलंय नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात?

"उत्तरांचलची (उत्तराखंड) निर्मिती झाली तेव्हा छोटी राज्ये निरुपयोगी आहेत, असे म्हटले होते. उद्योगांना संधी मिळाली नाही. आपल्याला ही परिस्थिती पूर्ववत करायची आहे. आपल्याला उत्तरांचलचा रुबाब जपायचा आहे. उत्तरांचलची ओळख निर्माण करायची आहे. येथे पर्यटनाचा विकास करायचा आहे. इथलं अध्यात्मिक पर्यटन टिकवायचे आहे. त्यासोबतच आजच्या पिढीच्या आणखी काही गरजा आहेत. उत्तरांचलमध्ये 100 कोटींची बाजारपेठ आहे. या देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला गंगेत डुबकी मारायला इथं यायचे आहे. या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाला संधी मिळाल्यास आपल्या आई-वडिलांना बद्रीनाथ आणि केदारनाथला घेऊन जावेसे वाटते. आपल्यासमोर 100 कोटींची बाजारापेठ आहे. तुमची योजना अशी असायला हवी की 100 कोटी देशवासी इथे सहज येतील आणि तुम्ही त्यांचे स्वागत करु शकाल," असे पंतप्रधान मोदी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

मोदी आर्काइव्हने ट्विट केलेला हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिट्विट केला आहे. 'हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अनेक आठवणी जाग्या झाल्या. निश्चितच संकल्प अजूनही तसाच आहे!,' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यानस हा व्हिडिओ 13 मे 2001 चा आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी भाजपचे सरचिटणीस होते. यानंतर 3 ऑक्टोबर 2001 रोजी ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.