ही अराजकता माजवण्याची पद्धत, पोलिसांच्या कारवाईचा निषेध- आंबेडकर

 पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

Updated: Dec 6, 2019, 04:28 PM IST
ही अराजकता माजवण्याची पद्धत, पोलिसांच्या कारवाईचा निषेध- आंबेडकर  title=

हैदराबाद : हैदराबाद हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी या एन्काऊंटरचे समर्थन करतंय तर पोलिसांनी कायदा हातात घ्यायला नको होता असेही बोलले जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे आरोपी होते त्या सर्व आरोपींना गोळ्या घालण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा आम्ही निषेध करतो असे आंबेडकर म्हणाले आहेत. पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

रेड्डी या महिलेवर झालेला अत्याचार निंदनीय आहे. सर्व देशाने याची निंदा केली असून यासाठी न्याय मागितला आहे. पोलिसांनी या आरोपींना कोर्टासमोर न्यायला पाहीजे होते. फास्ट ट्रॅक वर न्यायला हवे होते असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. कोर्टाने न्याय देणे गरजेचे आहे. पोलीसच न्याय करायला लागले तर कोर्टावर कोणाचा विश्वास राहणार नाही. उद्या कोणीही पोलिसांना सुपारी देईल आणि संपवेल याचा विचार व्यवस्थेने केला पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हैदराबाद येथील डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यासोबत झालेला अत्याचार हा निंदनीय आहे. डॉ. रेड्डी यांना न्याय मिळालाच पाहिजे पण कायदेशीर न्याय मिळाला पाहीजे असे ते म्हणाले. आजचा हैद्राबाद पोलिसांचा एन्काऊंटर कायद्याला धरून नाही. ही अराजकता माजवण्याची पद्धत आहे. पोलिसांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली आहे.

कुटुंबाची प्रतिक्रिया

या एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडित तरूणीच्या वडिलांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. माझ्या मुलीच्या मृत्यूला 10 दिवस झाले. मी हैदराबाद पोलीस आणि सरकारचे खूप आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.

पोलिसांना सलाम

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिनं ट्विट करत पोलिसांच्या या कामगिरीला सलाम ठोकला आहे. 'हैदराबाद पोलिसांनी खूपच चांगलं काम केलंय... आम्ही तुम्हाला सलाम करतो' असं सायनानं सोशल मीडियावर म्हटले आहे.

निकम यांची प्रतिक्रिया 

पोलिसांना देखील स्वरक्षणाचा अधिकार आहे. तशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती तर मग पोलिसांनी आरोपीला कंबरेखाली गोळी का मारली नाही? असा प्रश्न ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. लोकांनी कायद्याने प्रस्थापित केलेली संकल्पना मोडकळील निघाली अशी भावना निर्माण होऊ नये. न्यायालयाकडून निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी देखील यासगळ्याला जबाबदार असल्याचे उज्वल निकम म्हणाले. कायद्याचा दरारा निर्माण होत नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.