कर्नाटकातील राजकीय भूकंपाचे मुंबईत पडसाद

सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने

Updated: Jul 7, 2019, 04:44 PM IST
कर्नाटकातील राजकीय भूकंपाचे मुंबईत पडसाद  title=

नवी दिल्ली : कर्नाटकात राजकीय भूकंप झाला आहे. त्याचे हादरे बंगळुरूसोबतच मुंबई, दिल्लीतही बसत आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या १२ आमदारांनी राजीनामे दिले. त्यापैकी काही आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान सुत्रांच्या माहितीनुसार आणखी ४ ते ५ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच एच डी कुमारस्वामी यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले तर ही स्थिती नियंत्रणात येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांपैकी अनेक जण सिद्धरामय्या यांच्या गोटातले आहेत. मात्र या सत्तांतरासाठी कुमारस्वामी तयार होतील का याबाबत शंका आहे. 

सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या बंगळुरू आणि दिल्लीत रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपवला आहे. याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्या परदेशात असून संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ते बंगळुरूला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे काही आमदार खासगी विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. वांद्रे कुर्ला संकुलातल्या सोफिटेल या पंचतारांकीत हॉटेलात हे आमदार सध्या वास्तव्य़ाला आहेत. कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.